बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
गेल्या दोन, तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी – अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर – बुधवत यांनी केली आहे.शिवसेना (उबाठा) च्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हा संघटक प्रा. डी.एस. लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. घाटावर आणि घाटाखाली दोन्ही भागातील तालुक्यांत शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पशुधनाचीदेखील हानी झाली आहे. रब्बी हंगामातील पिके गहू, ज्वारी, मका, कांदा बियाणे, चिया तसेच फळ लागवड क्षेत्राला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. पपईसह आंबा आणि इतर लिंबूवर्गीय फळ पिकांची झाडे उन्मळून पडली आहे. गतवर्षीच्या पीक विम्याला झालेला उशीर त्यातच खरीप हंगामातील उत्पादनाला भाव हमी न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे पावसाच्या या अवकृपेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोहंमद सोफियान, आशिष खरात, एकनाथ कोरडे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी, राहुल जाधव, सागर हिवाळे, किशोर सुरडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 213