अॅड. शर्वरी तुपकर पहाटेच पोहोचल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळ, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने मोठा फटका दिला आहे. यामुळे रब्बी पीक, भाजीपाला, फळबागा तसेच शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे, ही बाब हेरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी ४ एप्रिल रोजी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना धीर दिला.यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मधुकर शिंगणे, सहदेव लाड, राम अंभोरे उपस्थित होते. रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती अत्यल्प उत्पादन आले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बिकट परिस्थितीत निसर्गाने आणखीच भर घालून शेतकऱ्यांना पुन्हा संकटात लोटले आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस,वादळीवारा, चक्रीवादळ यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे, भाजीपाला आणि फळबागांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. तर काही भागातील शेडनेटचे आणि शेतकऱ्यांनी जनावरे बांधणे व शेतमाल ठेवण्यासाठी शेतात बांधलेल्या शेडचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. ४ एप्रिल रोजी पहाटे घराबाहेर पडून लोणार तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, महार चिकना, खापरखेड घुले यासह नुकसानग्रस्त भागात जाऊन नुकसान झालेल्या शेतीपिकांची, शेडनेडची अॅड. शर्वरी तुपकर व क्रांतिकारीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संकट मोठे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा धीर देत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झालेल्या शाळेची देखील त्यांनी पाहणी केली. वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील अॅड. शर्वरी तुपकर यांनी केली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मधुकर शिंगणे, सहदेव लाड, राम अंभोरे, संदीप सरकटे, सतीश वाघ, विशाल पिसे, संजाब पिसे, रमेश वाघ, ज्ञानेश्वर म्हस्के, संतोष ढाकणे, उद्धव नागरे, अशोक मुंढे, लक्ष्मण वाघ, गजानन पिसे, अनंथा पिसे, रवी पिसे, राजेंद्र पिसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *