मंगरुळ नवघरे:- विशेष प्रतिनिधी
उसने दिलेले दहा हजार रुपये चार लोकांसमोर का मागतो या कारणावरून चिडलेल्या चुलतभावाने पलंगावर झोपलेल्या भावाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. मंगरूळ नवघरे येथे १६ एप्रिलच्या सायंकाळी ही घटना घडली.अमोल दिगंबर मगर (३३) याने चुलतभाऊ पंकज राजेंद्र मगर (३५) याला दहा हजार रुपये उसने दिले होते. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अमोल मगर घरामध्ये पलंगावर झोपलेला होता. यावेळी घरात घुसून पंकजने दिलेले दहा हजार रुपये सर्वांसमोर का मागतो म्हणत डोक्यावर, तोंडावर आणि कानावर लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत अमोलचा खून केला. मारहाण सुरू असताना अमोलची आई मध्ये पडली असता तिलाही आरोपीने मारहाण केली.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील व अमडापूरचे ठाणेदार निखिल निर्मळ घटनास्थळी पोहोचले. मृत अमोल मगरच्या बाजूलाच राहणारा साला सुधाकर खपके यांनी अमडापूर पोलिसांत तक्रार दिली. दोन दिवसांपूर्वी अमोल व पंकज यांच्यात वाद झाला होता.तेव्हा पंकजने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ करीत आहेत. अवघ्या दहा हजारांसाठी वैर निर्माण करून आरोपी पंकजने आपल्याच चुलतभावाची हत्या केल्याने गावासह पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
Users Today : 218