मोताळा:-तालुका प्रतिनिधी
मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीत दिवसेंन्दिवस बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. ६ एप्रिल रोजी सारोळा मारोती शिवारात बिबट्याने ७ बकऱ्या ठार केल्या होत्या. त्या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी उलटत नाही तर २१ एप्रिलच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास गुळभेली शिवारात बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवित १२ बकऱ्यांच्या फडशा पाडला. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मोताळा तालुक्यातील आत्माराम पंढरी दळवी (वय ५५) यांची गुळभेली शिवारात गट क्रमांक ७८ मध्ये शेती आहे. त्यांनी शेतात पशुधनासाठी टीनशेडचा गोठा बांधलेला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी त्या टिनशेडमध्ये वकऱ्या बांधून ठेवून रात्री घरी निघून गेले होते. दरम्यान, २१ एप्रिलच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर तारेच्या जाळीत घुसून अचानक हल्ला चढवित ७ बकऱ्या, ३ बोकड, २ पिल्ले, असे बारा जनावरे ठार केले. तर १ बोकूड जखमी केल्याची घटना शेतकरी आत्मराम दळवी यांना सकाळी ६ वाजेच्या दरम्यान सदर भयावह परिस्थीती दिसून आली. त्यांनी घटनेची माहिती मोताळा वनविभागाला दिली. माहिती मिळताच मोताळा वनविभागाचे रोहिणखेड वर्तुळाचे वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक आर. बी. शिरसाट तसेच पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कोकाटे हे घटनास्थळी पोहचून त्यांनी ठार व जखमी झालेल्या बकऱ्यांचा पंचासमक्ष पंचनामा करुन सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. कर्मचारी साडेसहा तासाने पोहचले घटनास्थळी बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना ६ वाजता उघडकीस आली. सदर घटनेची माहिती पोलिस पाटील गजानन धायडे व इतर १० ते १२ जणांनी सकाळी ८ वाजता मोताळा वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी क्षत्रिय कर्मचाऱ्यांमध्ये मोडत असल्याने त्यांनी १ तासात घटनास्थळी पोहचणे आवश्यक होते. मात्र, कर्मचारी दुपारी १२.३० वाजता पंचनामा करण्यासाठी गुळभेली येथे पोहचल्याने शेतकऱ्यांनी वनविभागाचा रोष व्यक्त केला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी नांदुरा तालुक्यातील खैरा येथील अनंता महादेव गावंडे (वय ४०) हे शेतात भाजीपाला गवार, भेंडी व मक्याला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. ते २१ एप्रिल रोजी सकाळी ७.१५ वाजता पाणी सुरु करण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवित नखोरे ओढले. यावेळी अनंता गावंडे समयसूचकता दाखवित ठिबकचा पाईप फिरवून आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्या पसार झाल्याने मोठा अनर्थ टळला.
Users Today : 222