उद्दिष्ट बाळगा; यश निश्चितच मिळेल — विनय लाडकर यांचे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
नागपूर — “विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा. पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिल्यास, यश मिळवणे सहज शक्य आहे,” असे प्रतिपादन विनय लाडकर, कोषाध्यक्ष, लिबरल एज्युकेशन सोसायटी, नागपूर यांनी केले. हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल बोर्डच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रोटरी क्लब, नागपूर साउथ च्या सहकार्याने हे नवीन बास्केटबॉल बोर्ड उपलब्ध झाले असून, त्याचे उद्घाटन लाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रसन्ना दाणी, अध्यक्ष, रोटरी क्लब नागपूर साउथ, डॉ. धनंजय वेलुकर, अध्यक्ष, महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन, किरण दुरूगकर, अध्यक्ष, हडस हायस्कूल नागपूर अलुमिनी असोसिएशन हे मान्यवर उपस्थित होते.
प्रसन्ना दाणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हडस हायस्कूलने गेल्या ८२ वर्षांपासून उत्कृष्ट क्रीडा परंपरा जपली आहे. येथून घडलेले अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरले आहेत.”
डॉ. धनंजय वेलुकर यांनी बास्केटबॉल असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि हडसच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत, कौशल्य विकासासाठी असोसिएशन सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
माजी विद्यार्थी किरण दुरूगकर यांनी शाळेबद्दलची आपुलकी व्यक्त करत विविध क्रीडा साहित्य भेट दिले.
कार्यक्रमात अपोलो बास्केटबॉल क्लब च्या सौजन्याने उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षक दिलीप बापट, देवेंद्र मैराळ आणि सुरेश मानकर यांचा सत्कार प्राचार्या जयश्री रानडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कीट प्रदान करण्यात आला.
प्रास्ताविकात प्राचार्या जयश्री रानडे यांनी हडसच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आलेख मांडला. लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. पी. जोशी व सचिव निलेश साठे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजन विशाल लोखंडे व शीतल मोहोड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सचिन गिरी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुशील वंजारी यांनी केले. अजय लाबडे यांनी आभार मानले.
Users Today : 22