बिंदूमाधव जोशी यांच्या स्मृतीनिमित्त विचारमालिका पूर्ववत सुरू होणार – ग्राहक पंचायतीचा निर्णय

KHOZ MASTER
2 Min Read

बिंदूमाधव जोशी यांच्या स्मृतीनिमित्त विचारमालिका पूर्ववत सुरू होणार – ग्राहक पंचायतीचा निर्णय

नागपूर – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी विचारमालिका काही काळासाठी खंडित झाली होती. मात्र, दिवंगत बिंदूमाधव जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय नुकताच रामदासपेठ येथील कार्यालयात झालेल्या त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात घेण्यात आला. ही मालिका पुन्हा सुरू केल्याने त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात कार्यालयीन कामकाजाची नियमितता वाढविण्याच्या दिशेनेही प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. यासोबतच, ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष स्व. राजाभाऊ पोफळी, ग्राहक संरक्षण कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष ए. गोविंददासजी मुंदडा, बापू महाशब्दे, आणि सचिव सुरेश बहिरट यांच्या स्मृतीदिनाचाही साजरा करण्याचे निर्देश प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी दिले आहेत.

सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिण्यांनी तसेच महाराष्ट्रातील विविध प्रांतांनी या निर्देशांनुसार स्मृतीदिनांचे आयोजन करावे, यासाठी लेखी सूचना क्षेत्रप्रमुखांनी प्रांताध्यक्षांकडे पाठवाव्यात, असा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

कार्यक्रमात प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार यांनी बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रीय सदस्य गजानन पांडे, प्रांत कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी, प्रांत प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, नागपूर महानगर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, तसेच प्रसाद पोफळी, संजय जोशी, संजय देशपांडे, विवेक दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रकाश भुजाडे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *