दोन नव्या रोड स्विपिंग मशीनचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर, १७ मे – नागपूर महापालिकेने शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आणखी दोन नव्या मेकॅनाईज्ड रोड स्विपिंग मशीन खरेदी केल्या आहेत. या दोन्ही मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भांडेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रात पार पडले.
या सोहळ्याला आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, तसेच सहायक आयुक्त सोनम देशमुख उपस्थित होते.
शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विकासकामे, उड्डाणपुलांचे वाढते जाळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यांत्रिक सफाईचा अवलंब सुरू केला आहे. या नव्या मशीनमुळे मुख्य रस्ते आणि उड्डाणपुलांची सफाई अधिक कार्यक्षमतेने होणार आहे.
या नव्याने समाविष्ट केलेल्या मशीनमध्ये धूळ कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा आणि सक्शन होज पाईप आहे. त्यामुळे धूळ उडण्याचे प्रमाण कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच, रस्त्यालगत साचलेला कचरा आता मनुष्यबळाच्या वापराशिवाय थेट मशीनने उचलता येणार आहे, यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे.

महानगरपालिकेच्या सेवेत आता एकूण ९ रोड स्विपिंग मशीन कार्यरत असून, यापूर्वी एनसीएपी आणि १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. आणखी सहा मशीनसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मागणीही करण्यात आलेली आहे.
नवीन यंत्रणा शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Users Today : 49