“झिरो डिस्चार्जसाठी पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य – बावनकुळे”
विदर्भ पाणी परिषदेत पाण्याच्या पुनर्वापरावर भर, जलसंवर्धनातूनच विकसित महाराष्ट्र – बावनकुळे
नागपूर, दि. ८ जून:
“पाण्याचा पुनर्वापर करून झिरो डिस्चार्ज संकल्पना प्रभावीपणे राबविणे ही काळाची गरज आहे.
जलसंवर्धनातूनच विकसित महाराष्ट्र घडू शकतो,” असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

कोराडी ऊर्जा प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो, हे उदाहरण देत त्यांनी पर्यावरणपूरक उपायांची आवश्यकता अधोरेखित केली.
विदर्भ पाणी परिषदेत मंत्री बावनकुळे उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृहात आयोजित तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषद सुरू आहे. या परिषदेत यशोगाथा सादरीकरणाच्या सत्रात मंत्री बावनकुळे बोलत होते.

जलसंवर्धनासाठी ठोस उपायांची गरज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंवर्धन अभियानाचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, “पेयजलाचे आव्हान ओळखून सिंचन, पिण्याचे व औद्योगिक पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे.”
अमरावती व नागपूर विभागातील ९ हजारांहून अधिक बंधाऱ्यांची दुरुस्ती झाल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा तयार होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना केले आवाहन
बावनकुळे यांनी एनएसएस स्वयंसेवकांना मृत बंधारे शोधून त्यांची दुरुस्ती करून जलसंवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले. महसूल विभागाद्वारे नालेजोड अभियान राबविण्यात येत असून, पर्यावरण अभियानांतर्गत आईच्या नावाने झाड लावा हा संदेश त्यांनी दिला.
पाणी परिषदेत यशोगाथांचे सादरीकरण:
रुपेश सयाम – मुरादपूर येथील ‘तरंगते सौर उपसा सिंचन योजना’
मिलिंद भगत – ‘तामसवाडा पॅटर्न’
सचिन कुलकर्णी – वाशिम जिल्ह्यातील पाणी व्यवस्थापन व श्रमदान यशोगाथा
गणपतराव आप्पासाहेब पाटील – क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प
विलास चौथाई – सांगली नदी पुनर्जीवन प्रकल्प
कार्यक्रमाचे संचालन डॉ. राज मदनकर यांनी केले, तर आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले.
