सामाजिक समतेच्या कार्याला मान्यता : सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना ‘महात्मा फुले विचार रत्न’ पुरस्काराने गौरव
नागपूर : संत कबीर जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवामंडळ, नागपूर यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात पुणे येथील सत्यशोधक आणि समाजसुधारक रघुनाथ दादा ढोक यांना ‘महात्मा फुले विचार रत्न’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हे सन्मानचिन्ह सामाजिक समतेच्या मूल्यांची प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची सार्वजनिक पातळीवरील मान्यता आहे.
रघुनाथ ढोक हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारसरणीचे प्रामाणिक अनुयायी असून, ते स्वतः फुलेंच्या वेशभूषेत समाजप्रबोधन करतात. विवाहसंस्थेतील कर्मकांड, जात-पात आणि भेदभावाला दूर ठेवत त्यांनी आजवर ५३ जातीय व आंतरजातीय विवाह सत्यशोधक पद्धतीने पार पाडले आहेत. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे समतेवर आधारित नाते असले पाहिजे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून सातत्याने दिला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी ढोक यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटले, “ढोक यांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, तो महात्मा फुलेंच्या माणुसकीच्या विचारांचा, समतेच्या मुल्यांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचा गौरव आहे.”
सत्कार स्वीकृत करताना रघुनाथ ढोक यांनी नम्रपणे सांगितले, “हा पुरस्कार माझा नसून, महात्मा फुलेंच्या विचारांचा आहे. समाजप्रबोधनाचे हे कार्य अधिक जबाबदारीने पार पाडण्याची संधी म्हणून मी या पुरस्काराकडे पाहतो.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक यावले होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, “संत कबीर व महात्मा फुले यांचे विचार हे सामाजिक समतेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्यामुळे समाजात बंधुभाव, जागृती आणि परिवर्तनाची ऊर्जा निर्माण होते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेंद्र बुराडे यांनी केले. तर समारंभाचे सुत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले.
या गौरव सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महात्मा फुले विचार परंपरेचे अभ्यासक डॉ. दिलीप नेवासे (सातारा), माजी न्यायमूर्ती शिवदास महाजन (पुणे), माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे, ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरकार यांचा समावेश होता.
संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुनसे, संगीता जावळे, प्रा. रामदास टेकाडे, प्रभा ठवकर, रुपराव वाघ, मुरलीधर नरड, सियाराम चावके, आनंद माथने आदींसह अनेक पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पुरस्कार समतेच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Users Today : 39