नेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दहिफळ येथे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या उत्तम परसबाग प्रकल्पाची पाहणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशल कॅपिटल इन्स्टिट्यूट (SCI) संस्थेच्या टीमने नुकतीच केली. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या सेंद्रिय भाजीपाल्याचे त्यांनी कौतुक करत “ही शाळा ग्रामीण भागातील प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे मत व्यक्त केले.
आरोग्यम धनसंपदा या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश सेंद्रिय शेती, रासायनिक फवारणीमुक्त भाजीपाला, आणि शाश्वत किचन गार्डन तयार करणे हा आहे. SCI संस्था भारतातील निवडक गावांना दरवर्षी भेट देऊन अशा प्रकल्पांची स्थिती पाहते. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील टोकावरील दहिफळ गावाची निवड करण्यात आली होती.
शाळेतील परसबागेमध्ये ३० पेक्षा अधिक भाजीपाला पिकांची लागवड पूर्णपणे सेंद्रिय खतांच्या वापरातून करण्यात आली आहे. याचे निरीक्षण करताना संस्थेच्या अमेरिकन चेअरमन गीता मेहता, श्रद्धा गुप्ता (जेसीएफ प्रमुख), श्वेता झुंजूनवाला (माजी बोर्ड मेंबर), इमा गडेंफे (प्रोग्राम मॅनेजर, अमेरिका), आणि गौरीश (प्रोग्राम मॅनेजर, मुंबई) यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
या भेटीवेळी माधवी राजे (विदेशी प्रकल्प प्रमुख), गजानन परसोडकर (सीईओ, दीनदयाल सेवा प्रतिष्ठान), तसेच शाश्वत शेती व किचन गार्डन प्रकल्पाचे सदस्य उपस्थित होते. सॉक्स मॅनेजर कांचन जाब्रस यांनी सांगितले की, “दहिफळ शाळेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसह शेतीबद्दलची आवड जाणवते, जी शिक्षणात नवा दृष्टिकोन निर्माण करते.”
या प्रकल्पामागे गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, नितीन जाधव, संजय कुकडे, वंदना नाईक, अरविंद सरागे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक बालाजी मुद्दमवार यांच्या कल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम शिक्षक गजानन गौरकार, किशोर मुंडे आणि सुशील राठोड यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे राबविला जात आहे.
या परसबागेत उत्पादित भाजीपाला विद्यार्थ्यांच्या मध्यांह्न भोजनात दररोज वापरला जातो, ज्यामुळे मुलांच्या आरोग्याची गुणवत्ता सुधारली आहे. शाळेच्या विकासासाठी शामराव राठोड, कैलास ढाकुलकार, फिरोज पठाण, चरणदास चव्हाण आणि पालक वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
दहिफळसारख्या दुर्गम भागातील या शाळेची सेंद्रिय शेती व स्वावलंबनाची ही प्रेरणादायी कहाणी आता सात समुद्रापार अमेरिकेतही पोहोचली असून, परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
