नेर प्रतिनिधी
स्वर्गीय हरिभाऊजी नागतुरे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, वणी आणि आर्टिस्ट स्पेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्प स्पर्धा आणि प्रदर्शनात नेर शहराचे सुपुत्र, सृजनशील चित्रकार तथा मुक्तरंग आर्ट अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी विशेष यश संपादन केले आहे.
२८ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विदर्भातील लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधील एकूण ३८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेतील शिल्प विभागात ज्ञानेश्वर सोनटक्के यांच्या ‘इम्प्लीकेशन’ (परीणाम) या शिल्पकृतीची निवड सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून करण्यात आली. पुरस्कार स्वरूपात रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन वणीचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय मुकेवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजीव भाऊ रेड्डी, किरण दरेकर, अशोक सोनटक्के, प्राचार्य प्रदीप पाटणकर, प्राचार्या योगिता शेळके, रणजित वर्मा, रणजित वणकर आणि प्रा. प्रदिप नागतुरे उपस्थित होते.
चित्रकार ज्ञानेश्वर सोनटक्के यांना मिळालेला हा त्यांच्या कलाजीवनातील ५० वा पुरस्कार ठरला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नेर शहराला राज्यभरात नावलौकिक प्राप्त झाला असून, कला क्षेत्रातून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Users Today : 10