राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोपांचा भडिमार — ‘हरियाणात २५ लाख बोगस मते, बिहारमध्येही मतचोरी होणार

Khozmaster
4 Min Read

नवी दिल्ली प्रतिनिधी ;-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर मतचोरीच्या आरोपांची झोड उठवली आहे. नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विडिओ आणि पुरावे सादर करत गंभीर आरोप करत म्हटले की, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले असून, यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला.

राहुल गांधींनी दावा केला की, हरियाणातील निवडणुकीत तब्बल २५ लाख बोगस मते टाकण्यात आली, तर काही ठिकाणी एकाच व्यक्तीने अनेक ठिकाणी मतदान केले. एका मतदाराने २२ ठिकाणी मतदान केल्याचा, तसेच एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.

त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, हरियाणामध्ये एका घर क्रमांक ५१ मध्ये ६६ मतदारांची नावे आहेत, तर १,२४,००० पेक्षा अधिक मतदारांचे फोटो बनावट असल्याचे दिसून आले आहे. “हे मतदार खरे आहेत का, आणि आयोगाने याची पडताळणी केली होती का?” असा थेट सवाल राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी म्हणाले, “एका महिलेनं २२ वेळा मतदान केलं, एका मुलीने १० ठिकाणी मतदान केलं. हरियाणात ५ लाखांहून अधिक डुप्लिकेट मतदार आहेत. आयोग सीसीटीव्ही फुटेज लपवत आहे, कारण तेच सत्य दाखवेल.”

त्यांनी पुढे दावा केला की, “हरियाणात जे झाले, तेच आता बिहारमध्ये घडणार आहे. मतदार यादीत गोंधळ असून, आमच्याकडे ती शेवटच्या क्षणी दिली गेली.” पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी बिहारमधील काही मतदारांना उपस्थित करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याचे दाखवले.                                                                                                                                                                                                                                                                    निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर — “तक्रार नोंदवली नाही, पुरावे न्यायालयात द्या”

राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रतिक्रिया देत काँग्रेसवरच प्रतिप्रश्नांचा भडिमार केला आहे. आयोगाने म्हटले आहे की, “काँग्रेसकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही.”

आयोगाने विचारले — “मतदानाच्या वेळी काँग्रेसचे एजंट मतदान केंद्रांवर काय करत होते? त्यांना जर एखाद्या मतदाराच्या ओळखीबद्दल शंका होती, तर त्यांनी तत्काळ आक्षेप का घेतला नाही?”

तसेच आयोगाने स्पष्ट केले की, “जर काही मतदार खोटे असले तरी, त्यांनी भाजपलाच मत दिले असे कसे म्हणता येईल?”

आयोगाने राहुल गांधींना सल्ला देत म्हटले आहे की, “जर त्यांच्या तक्रारीला पुरावे असतील, तर त्यांनी ती औपचारिकरीत्या निवडणूक आयोगाकडे दाखल करावी किंवा न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा.”

हरियाणातील ५० मतदारसंघांपैकी केवळ २२ अर्ज सध्या न्यायालयात दाखल आहेत आणि काँग्रेसकडून एकही अपील दाखल झालेले नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

एकंदरीत, राहुल गांधींच्या या आरोपांमुळे आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, मतदार यादीतील बोगस नावे आणि मतचोरीचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *