नवी दिल्ली प्रतिनिधी ;-
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संघाची भेट घेऊन विशेष अभिनंदन केले. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत संवाद साधत संघाच्या चिकाटी, एकजुटी आणि पुनरागमनाचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “भारतीय संघाने सलग तीन पराभवांनंतरही ज्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुनरागमन केले, ती कामगिरी उल्लेखनीय आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधील नाही, तर प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी आहे.”मोदींनी या भेटीत संघाच्या प्रत्येक सामन्याची आठवण काढत सांगितले की त्यांना या वर्ल्ड कपमधील भारताचे सर्व सामने लक्षात आहेत. संघाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पराभवानंतरही उभारी घेत अखेर विश्वचषक आपल्या नावावर केला, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.कर्णधार हरमनप्रीत कौर हिने या भेटीदरम्यान २०१७ च्या आठवणी जागवताना म्हटले, “त्या वेळी आम्ही ट्रॉफीशिवाय पंतप्रधानांना भेटलो होतो, पण आज आम्ही ट्रॉफीसह भेटलो आहोत. ही फक्त सुरुवात आहे, पुढेही आम्ही असेच यश मिळवत राहू.”उपकर्णधार स्मृती मंधाना हिने सांगितले, “पंतप्रधानांनी आम्हाला प्रेरणा दिली आहे. त्यांचे शब्द आणि प्रोत्साहन आमच्यासाठी अमूल्य आहे. मोदीजी आमच्यासाठी कायम प्रेरणास्त्रोत राहतील.”दिल्लीत भव्य स्वागत
विश्वविजेते भारतीय महिला क्रिकेट संघ मंगळवारी संध्याकाळी खास चार्टर्ड विमानाने दिल्लीमध्ये दाखल झाला. दिल्ली विमानतळावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले.
फुलांचे हार, जयजयकार आणि “भारत माता की जय”च्या घोषणा देत खेळाडूंना उत्साहाने सन्मानित करण्यात आले.संघातील सदस्य आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचेही विशेष सत्कार करण्यात आले. त्यानंतर संघाने निवासस्थानी एकत्र येऊन केक कापून आपला हा ऐतिहासिक विजय साजरा केला.या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरदेखील संदेश शेअर करून भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले,“भारतीय महिला क्रिकेट संघाने देशाला अभिमान वाटेल असे यश मिळवले आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण संघाला आणि प्रशिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!”भारतीय महिला क्रिकेट संघाच्या याकामगिरीने केवळ देशाचाच नाही तर संपूर्ण क्रिकेटविश्वाचा सन्मान उंचावला आहे.
Users Today : 18