नागपूर प्रतिनिधी :-
संस्कार भारतीच्या अखिल भारतीय साधारण सभेच्या निमित्ताने सुरेश भट सभागृहात ‘राष्ट्र स्वर आराधना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासाची गाथा सुमधुर संगीत, भावपूर्ण निवेदन आणि मनोवेधक नृत्यातून साकारण्यात आली.
कार्यक्रमाच्या मंचावर रा.स्व.संघाची पहिली शाखा लागलेल्या मोहिते वाड्याचे विशाल द्वार, मध्यभागी भगवा ध्वज, तसेच डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमा सजवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साकारलेली प्रस्तुती वातावरण भारावून टाकणारी ठरली.
देशभरातून आलेले ४०० कलासाधक आणि कार्यकर्ते तसेच नागपूरकर नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
दीपप्रज्वलन संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसूर मंजुनाथ, पद्मश्री चित्रकार वासुदेव कामत, आणि विदर्भ प्रांत अध्यक्षा कांचन गडकरी यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारती ध्येयगीतावर अवंती काटे यांच्या नृत्याने झाली. त्यानंतर गायक अमर कुलकर्णी, श्याम देशपांडे, आनंद किटकरू यांनी ‘सागर वसना पावन देवी’, ‘संस्कृती सबकी एक’ यांसह विविध संघगीते सादर केली. सहगायक म्हणून आकांक्षा चारभाई, निधी रानडे, देविका मार्डीकर, आणि अक्षय चारभाई यांनी सहभाग घेतला.
वादनसाथ आनंद मास्टे, शिरीष भालेराव, मोरेश्वर दहसहस्र, अभिजित बोरीकर, गजानन रानडे, आणि अक्षय हारले यांनी दिली.
नृत्य संयोजन अवंती काटे, नेपथ्य सुनील हमदापुरे, आणि ध्वनिव्यवस्था प्रोसाउंड यांची होती.
आशुतोष अडोणी यांच्या भावपूर्ण निवेदनाने श्रोत्यांना संघाचे स्वरूप, कार्य आणि प्रेरणा यांचा हृदयस्पर्शी परिचय झाला.
Users Today : 22