विशेष प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय
अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका–भारत संबंधांमध्ये तणाव वाढला असतानाच, भारताची चीन आणि रशियासोबत वाढत चाललेली जवळीक आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर चीनने भारताच्या आर्थिक प्रगतीचे जाहीर कौतुक करत थेट जगासमोर भारताचे उदाहरण मांडले आहे.
चीनच्या दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. भारताची ही प्रगती त्याच्या आर्थिक क्षमतेची खरी ताकद दर्शवते, असे चीनने स्पष्ट केले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार भारताचा सध्याचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) सुमारे 4.18 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारत जर्मनीलाही मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
चीनच्या दूतावासाचे अधिकृत विधान
चीनच्या दूतावासातील प्रवक्त्या यू जिंग यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
“भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. भारताने हे सिद्ध केले आहे की, खरी ताकद ही इतिहासाशी प्रामाणिकपणे सामना करून, त्यातून शिकून आणि जबाबदारी स्वीकारून उभी राहते.”
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्या तैवान मुद्द्यावरून जपान आणि चीनमधील तणाव वाढलेला असताना चीनकडून भारताच्या यशाचे कौतुक करणे हे अप्रत्यक्षपणे जपानवर टीका करण्याचेही एक पाऊल मानले जात आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या टॅरिफनंतर चीनने यापूर्वीही भारतीय वस्तूंना आपल्या बाजारात स्वागत असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बदलत्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
Users Today : 11