चिखली प्रतिनिधी :
आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जात असताना चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील एका महिलेची संघर्षगाथा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे. पतीच्या निधनानंतर आलेल्या संकटांना न घाबरता, परिस्थितीशी दोन हात करत वंदना भास्कर भुसारी यांनी उभा केलेला संघर्ष खरोखरच प्रेरणादायी आहे.
पतीच्या निधनाने कोसळले आभाळ
चिखली बसस्थानक परिसरात भास्कर भुसारी हे चहा-नाश्त्याचे छोटे हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घर सांभाळत असताना वंदनाताई पतीला व्यवसायात मदत करत होत्या.
मात्र २०२० मध्ये अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने भास्कर भुसारी यांचे निधन झाले आणि कुटुंबाचा आधारवड कोसळला.
सुरुवातीला काही काळ नातेवाईकांनी मदत केली, परंतु काही दिवसांतच परिस्थिती बदलली. हॉटेल महिनाभर बंद राहिल्याने साठवलेले पैसे संपले आणि मुलांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिला.
परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय
या कठीण परिस्थितीत खचून न जाता वंदनाताईंनी पतीने सुरू केलेले हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पदरी लहान मुले, हाताशी भांडवल नाही आणि राहण्यासाठी स्वतःचे घरही नाही— अशा परिस्थितीत त्यांनी हॉटेलमध्येच मुक्काम करून व्यवसाय सुरू ठेवला.
पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या हॉटेल व्यवसायात एका महिलेने काम करणे आजही अनेकांना सहज पचत नाही. त्यामुळे वंदनाताईंना अनेकदा टोमणे, वाईट नजर आणि सामाजिक दबावालाही सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत जिद्दीने काम सुरू ठेवले.
मुलांच्या भविष्यासाठी अखंड धडपड
आज वंदनाताई पहाटेपासून रात्रीपर्यंत हॉटेलमध्ये कष्ट करत आहेत. त्यांच्या तीन मुलांचे शिक्षणही सुरू आहे.
-
मुलगी भारती – १२ वीमध्ये शिक्षण
-
मुलगा चैतन्य – १० वीमध्ये शिक्षण
-
मुलगा श्रेयश – ६ वीमध्ये शिक्षण
मुलांचे शिक्षण आणि रोजचा खर्च भागवण्यासाठी त्या अखंड मेहनत करत आहेत.
आजही संघर्ष कायम
वंदनाताईंनी जिद्दीने उभा केलेला व्यवसाय अनेकांना प्रेरणा देणारा आहे. मात्र आजही त्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर नाही, व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा नाही आणि मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता कायम आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने अशा संघर्षशील महिलेचा सन्मान होणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांना आणि त्यांच्या मुलांना भविष्यासाठी भक्कम आधार मिळणे ही काळाची गरज आहे.
चिखली बसस्थानक परिसरातील धुराने काळवंडलेल्या त्या छोट्याशा हॉटेलमध्ये आजही वंदनाताईंची जिद्द धगधगत आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा हा प्रवास कधी थांबणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
Users Today : 23