डोणगाव प्रतिनिधी –
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेल्या एका पोलिस हवालदाराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबराव भीमराव शेळके (वय ५६) हे बुलढाणा मुख्यालयात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होते. ते मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी होते. त्यांनी बाबुळखेड येथील शेतशिवारात असलेल्या लाड यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी हलविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत पंजाबराव शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, जे पोलिस अधिकारी इतरांच्या आत्महत्येच्या घटनांचा पंचनामा करतात, त्याच पोलिसांना स्वतःच्या सहकाऱ्याचा पंचनामा करण्याची वेळ आली, यामुळे पोलिस विभागातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे हिवरा आश्रम, बाबुळखेड आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Users Today : 27