मलकापूर प्रतिनिधी :
सनई-चौघड्यांचे सूर, नातेवाईकांची लगबग आणि आनंदाचे वातावरण… अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात सुरू असलेला विवाहसोहळा रंगात आला असतानाच अचानक मधमाश्यांच्या थव्याने लग्नमंडपावर हल्ला चढविल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत चार महिला व तीन पुरुष असे सात जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली.
अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिर परिसरात दाभाडी येथील चोपडे परिवारातील नवरी आणि धरणगाव येथील चौधरी परिवारातील नवरदेव यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच मंदिर परिसरात लगबग सुरू होती. नवरीला हळद लावून पुढील विधी सुरू असताना मंडपात वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक आणि पाहुण्यांची मोठी गर्दी होती.
याचदरम्यान सुरुवातीला काही मधमाश्या मंडपात उडताना दिसल्या. लाल शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीभोवती त्या घोंगावू लागल्या. त्यांनी त्या हाताने हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच जवळील झाडावरील मधमाश्यांचे मोठे पोळ उठले आणि हजारो मधमाश्यांच्या थव्याने थेट लग्नमंडपावर हल्ला चढविला. क्षणातच मंडपात भीती, किंकाळ्या आणि धावाधाव सुरू झाली.
मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे महिला, मुले आणि वृद्धांसह सर्व पाहुणे जीव वाचवण्यासाठी पळू लागले. काहींनी मंदिर परिसरातून बाहेर पळ काढला, तर काहींनी झाडांच्या आडोशाला आसरा घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हालचाल करणाऱ्यांनाच मधमाश्यांनी अधिक डंख मारले, तर काहीजण जागच्या जागी स्तब्ध उभे राहिल्याने या हल्ल्यातून बचावले
या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांना मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात डंख मारले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी एका जखमीच्या शरीरातून सुमारे एक हजार ते अकराशे तर दुसऱ्याच्या शरीरातून दीडशे ते दोनशे मधमाश्यांचे काटे बाहेर काढले. “डोक्यावर जितके केस नसतील त्यापेक्षा जास्त काटे काढावे लागले,” अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत चार महिला व तीन पुरुष असे एकूण सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये नवरदेवाच्या वडिलांचाही समावेश आहे. जखमींना प्रथम अनुराबाद येथील डॉ. गोपाल लीलाकर यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, या घटनेत सुमारे २० ते २५ पाहुण्यांना मधमाश्यांचा डंख बसला असून काहींना किरकोळ दुखापत झाली. गावातील नागरिकांनी त्यांच्या अंगातील काटे काढून प्राथमिक उपचार केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, सरपंच ज्ञानदेव ढगे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यास मदत केली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ विवाह सोहळा पूर्णपणे विस्कळीत झाला. भीतीचे वातावरण निवळल्यानंतर पुढील विवाह सोहळा सोमेश्वर मंदिरावरून धरणगाव येथे हलविण्यात आला. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अनुराबादचे सरपंच ज्ञानदेव ढगे यांनी दिली
Users Today : 36