मेहकर प्रतिनिधी :
शहरातील अनेक व्यापारी सध्या आग्या मोहोळाच्या मधमाशांमुळे त्रस्त झाले असून मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे व्यवसायात मंदीचे सावट असताना दुसरीकडे मधमाशांच्या त्रासामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरात वाढला त्रास
शहरातील लाहोटी कॉम्प्लेक्ससह काही ठिकाणी दरवर्षी मार्च ते मे महिन्यादरम्यान आग्या मोहोळ बसतात. साधारणपणे काही दिवसांनंतर हे मोहोळ शांततेने निघून जातात. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी असून मधमाशा दुकानदार व ग्राहकांवर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.
दुकानदार आणि ग्राहकांमध्ये भीती
काही वेळा मधमाशा थेट दुकानांमध्ये शिरकाव करत असल्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक मधमाशांचा हल्ला होण्याची भीती असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी
या आग्या मोहोळापासून सुटका कशी करावी आणि यासाठी कोणत्या विभागाने कारवाई करावी, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मधमाशांचे मोहोळ सुरक्षितपणे हटवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना केल्यास व्यापारी व नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
Users Today : 21