श्रींच्या मंदिरात १३२ वा श्रीराम नवमी उत्सव प्रारंभ; गुढीपाडव्याला भाविकांची मांदियाळी

KHOZ MASTER
2 Min Read

शेगाव –
संतनगरी शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही १३२ व्या श्रीराम नवमी उत्सवाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ झाला. १९ मार्चपासून सुरू झालेल्या या उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

उत्सवादरम्यान मंदिरात दररोज सकाळी ६ ते ६.४५ या वेळेत काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ तर रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे श्रीहरी कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. १९ ते २६ मार्चदरम्यान सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या सप्ताहात गुरुवार, १९ मार्च रोजी हभप श्रीरामबुवा पाटील यांचे श्रीहरी कीर्तन झाले. २० मार्च रोजी हभप लखन बुवा पाटील (चिंचखेडा), २१ मार्च रोजी हभप गजाननबुवा काळे (जुन्नर), २२ मार्च रोजी हभप ज्ञानेश्वरबुवा वराडे (शेलूद), २३ मार्च रोजी हभप पांडुरंग बुवा आवारकर (कातळवा), २४ मार्च रोजी हभप ज्ञानेश्वरबुवा काकडे (हावरगाव), २५ मार्च रोजी हभप भगीरथबुवा काळे (सिन्नर) तर २६ मार्च रोजी हभप पंडितबुवा क्षीरसागर (श्रीक्षेत्र आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.

श्रीराम नवमीच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप समाधानबुवा शर्मा (बीड) यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे.

पालखी मिरवणूक आणि रामायण स्वाहाकार
उत्सवानिमित्त २३ मार्चपासून अध्यात्म रामायण स्वाहाकार यागास प्रारंभ झाला आहे. २६ मार्च रोजी श्रीराम नवमीच्या दिवशी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान होणार आहे. त्यानंतर श्रींच्या मंदिर परिसरातून अश्वासह पताकाधारी, टाळकरी व वारकरी यांच्या सहभागाने टाळ-मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात पालखी परिक्रमा काढण्यात येणार आहे.

उत्सवाची सांगता २७ मार्चला
२७ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ या वेळेत हभप प्रमोदबुवा राहाणे (पळशी) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर दहीहंडी गोपालकाला कार्यक्रमाने १३२ व्या श्रीराम नवमी उत्सवाची सांगता होईल.

संस्थानमध्ये उभारली गुढी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने संस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात आली. मंदिर परिसरात आंब्याच्या पानांची तोरणे व केळीचे खांब लावण्यात आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी ‘गजानन महाराज की जय’चा घोष करत श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे स्वागत केले.

0 9 4 3 8 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *