चिखली –
शासनाच्या शेतीविषयक धोरणांविरोधात आणि शेतकरी आत्महत्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी चिखली येथे ‘एक दिवस उपवास अन्नदात्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. १९ मार्च रोजी आयोजित या उपक्रमात शेकडो संवेदनशील नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरीपुत्रांनी सहभागी होत अन्नत्याग करून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील तत्कालीन सरपंच असलेल्या साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी मालतीताई आणि चार मुलांसह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. या घटनेला ४० वर्षे पूर्ण होत असताना आजही बळीराजाची परिस्थिती बदललेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.
१९ मार्च हा दिवस शेतकरी चळवळीच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. या घटनेची आठवण म्हणून आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी सुरू केलेली ‘उपवासाची परंपरा’ चिखलीत आजही जपली जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तालुक्यातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत अन्नत्याग केला.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चुकीचे निर्यात धोरण, शेतमालावर लावले जाणारे निर्यात शुल्क व निर्यातबंदी यामुळे शेतमालाचे दर कोसळत असल्याचा आरोप करण्यात आला. देशांतर्गत उत्पादन मुबलक असतानाही परदेशातून आयात होणाऱ्या मालामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त झाली.
खते, बियाणे, मजुरी आणि इंधनाचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च वाढत असतानाही त्या तुलनेत हमीभाव मिळत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारी पीक विमा रक्कम किंवा शासकीय मदत वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनातून शेतमालाला हमीभाव देणे, संपूर्ण कर्जमुक्तीची अंमलबजावणी करणे, सिंचन व वीज यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी धोरणे राबविण्याची मागणी करण्यात आली.
‘सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी शेतीविषयक धोरणे तीच राहतात,’ असा सूर उपस्थितांमध्ये उमटला. या अन्नत्याग उपक्रमात तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत शेतकरी प्रश्नांवर एकजूट दाखवली. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने करण्यात आली.
Users Today : 3