विद्यार्थ्यांची गुणवत्ता अनेकांसाठी प्रेरणादायी – अनिताताई सरनाईक ,श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात

KHOZ MASTER
2 Min Read

वाशीम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांची गुणवत्ता ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते, असे प्रतिपादन अनिताताई सरनाईक यांनी केले. त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या.

श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील सहा विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या २०२४-२५ शैक्षणिक सत्राच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय साळीवकर होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिवगर्जनेने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

या कार्यक्रमात अनिताताई सरनाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य विजय पोफळे यांच्या वतीने त्यांचे वडील लोककवी हरिश्चंद्रराव पोपळे यांच्या स्मरणार्थ प्रथम मेरिट मिळविणाऱ्या श्रावणी राजनकर हिला चांदीचे पदक देऊन गौरविण्यात आले.

सोहळ्यात महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. स्नेहदीप सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थीहितासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रा. गजानन बारड यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. पंढरी गोरे यांना समाजकार्य आचार्य पदवी मिळाल्याबद्दल शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले. तसेच सामाजिक सेवा अधीक्षक पदावर नियुक्ती झालेल्या प्रिया चव्हाण, सचिन नानवटे आणि कल्याणी धाराशिवकर यांचाही सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये एम.एस.डब्ल्यू.मध्ये प्रथम मेरिट मिळवत गोल्ड मेडल पटकावणाऱ्या श्रावणी रांजणकर, सहावी मेरिट मिळविणाऱ्या आरती श्रृंगारे, नववी मेरिट मिळविणाऱ्या सीमा श्रृंगारे, दहावी मेरिट मिळविणाऱ्या दीक्षा तायडे व निकिता इंगोले तसेच बी.एस.डब्ल्यू.मधून नववी मेरिट मिळविणाऱ्या शिवकन्या सरकटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी अनिताताई सरनाईक यांनी शिवछत्रपतींचे विचार व आधुनिक काळातील त्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. संजय साळीवकर यांनी शिवछत्रपतींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. शिवव्याख्याते शंकर भारती यांनी शिवचरित्र आणि वर्तमान परिस्थिती यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गजानन बारड यांनी केले तर डॉ. वसंत राठोड यांनी आभार मानले.

0 9 4 3 8 6
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *