रिसोड –
तालुक्यातील चिंचांबाभर येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी एका वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. द्वारकाबाई माणिकराव सानप (वय ७०) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी रात्री शेजाऱ्यांनी पाणी भरण्यासाठी आवाज दिला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराचा दरवाजा लोटून पाहिला. त्यावेळी घरामध्ये द्वारकाबाई सानप यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घराच्या छतावरील टिनपत्रे काढून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरात चोरी करताना महिलेच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या वेळी महिलेचा खून करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.
ही घटना १७ मार्चच्या रात्री घडली असावी, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मागील आठवड्यातही चाकोली येथील शेतशिवारातील गोठ्यावर राहणाऱ्या दोन कुटुंबांतील सदस्यांना मारहाण करून घरातील रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. तसेच भर जहागीर येथील सिंचन तलाव परिसरातून शेतकऱ्यांच्या मोटारपंपांच्या केबलची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
अल्पावधीतच सलग चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 🚨👮♂️📰
Users Today : 3