बुलढाणा –
बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड परिसरातून ४३ वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिला गूढरित्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अनिता गजानन इंगळे असे बेपत्ता महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन राजाराम इंगळे (वय ४८), रा. सुंदरखेड, बुलढाणा, हे खामगाव रोडवरील तिरुपती बालाजी नगर परिसरात वास्तव्यास असून खासगी नोकरी करतात. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता अनिता इंगळे यांनी “मी भावाच्या घरी जाते” असे सांगून घर सोडले.
मात्र, त्या रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर २० एप्रिल रोजी पहाटे फिर्यादी गजानन इंगळे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
फिर्यादीनुसार, अनिता इंगळे यांच्यावर मागील काही काळापासून मानसिक आजारावर उपचार सुरू असून त्या डॉक्टर बाहेकर यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होत्या. याच कारणामुळे त्या घरातून निघून गेल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुभाष म्हस्के करीत आहेत. पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू असून परिसरात चौकशी व तपासाची मोहीम राबवली जात आहे.
Users Today : 34