महाराष्ट्र —
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाहसोहळा आज अत्यंत आलिशान आणि शाही पद्धतीने पार पडत असून, यावरून राज्यात चर्चा आणि टीकेची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी हिचा विवाह साहिल चिलप याच्यासोबत गुंजाळवाडी येथे होत आहे. तब्बल १०० एकर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. लग्नातील सजावट, जेवणावळी आणि विविध कार्यक्रम अत्यंत थाटामाटात पार पडत असल्याचे समोर आले आहे.
याआधी काही महिन्यांपूर्वी झालेल्या साखरपुड्यातही मोठ्या प्रमाणात खर्च आणि उधळपट्टी झाल्याची चर्चा रंगली होती. त्या वेळी झालेल्या टीकेला उत्तर देताना इंदोरीकर महाराजांनी “काय बोंबलायचे ते बोंबला, लग्न याहून मोठं करणार,” असे विधान केले होते. आता प्रत्यक्षात विवाहसोहळ्यातही त्याचप्रमाणे भव्य आयोजन पाहायला मिळत आहे.
टीकेचे कारण काय?
इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनातून साधे, कमी खर्चिक विवाह करण्याचा सल्ला देत असतात. तसेच लग्नांमधील अनावश्यक खर्चावर ते वारंवार भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील या भव्य विवाहसोहळ्यावरून “कथनी आणि करणीतील विसंगती” असल्याची टीका सामाजिक माध्यमांवर केली जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या विवाहसोहळ्यास राज्यातील काही मंत्री, राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळदीचा समारंभ संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये पार पडला.
चर्चेचा विषय ठरलेला विवाह
साधेपणा आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या घरातील हा शाही विवाहसोहळा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, समर्थक आणि टीकाकार यांच्यात वाद रंगताना दिसत आहे.
Users Today : 28