अमरावती
अमरावती शहरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा मारहाण करून खून करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पैशांच्या वादातून तरुणाची हत्या
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार बाजार परिसरात रविवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद नाजीम सय्यद सालार (वय ३८, रा. शुक्रवार बाजार) असे मृतकाचे नाव आहे.
या प्रकरणी निशांत रवींद्र भोवते (२७, रा. शुक्रवार बाजार) आणि यशराज रवींद्र कोरी (२६, रा. राजापेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक व्यवहारावरून सय्यद नाजीम आणि निशांत भोवते यांच्यात मोबाईलवर वाद झाला होता. त्यानंतर नाजीम हे मदीना मांडा सेंटरजवळील गल्लीत आरोपींना भेटण्यासाठी गेले. तेथे झालेल्या वादातून आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत नाजीम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली.
पूर्ववैमनस्यातून दुसरा खून
दुसरी घटना खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वाभिमाननगर परिसरात घडली. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रेल्वे रुळाजवळ रवींद्र ईश्वरदास राजुरकर (५०, रा. स्वाभिमाननगर) यांची मारहाण करून हत्या करण्यात आली.
या प्रकरणी आकाश जगन्नाथ खोरगडे (२५, रा. स्वाभिमाननगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्या एका विधिसंघर्षित साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी रवींद्र राजुरकर यांना गाठून मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
मृतकाच्या पत्नी माधुरी राजुरकर यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे
Users Today : 14