मेहकर
मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० हून अधिक नागरिक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी सोमवारी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच बाधित रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
प्राथमिक तपासणीत दूषित विहिरीच्या पाण्यामुळे संसर्ग पसरल्याचे समोर आले आहे. यानंतर तातडीने टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेफळ आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ३० रुग्णांपैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल १९ रुग्णांपैकी १३ रुग्णांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.
गावात आरोग्य पथकांकडून सर्वेक्षण सुरू असून, नागरिकांना उकळलेले किंवा शुद्ध पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिसरात स्वच्छता राखण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुधारली नाही तर आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासन सतर्क झाले आहे.
Users Today : 22