देवेंद्र सिरसाट.नागपूर. हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथे एकता गणेश उत्सव मंडळाच्या वतीने नजीकच्या वागदरा (नवीन गुमगाव) येथील मधूबन आश्रमशाळेतील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी मधुबन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजय महल्ले,ज्येष्ठ पत्रकार डॉ.रमेश पाटील,पत्रकार राजेंद्र सांबारे आणि यशवंत हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक ढोमने उपस्थित होते. गांधी जयंतीचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेत बाजी मारणाऱ्या दिया हरडे,समृद्धी राऊत,श्रेया दुर्गे, संतोषी फुंडे,प्रगती हुलके आणि हर्षाली नंदनवार यांचे सुद्धा पारितोषिक देऊन मान्यवरांनी कौतुक केले.ज्येष्ठ पत्रकार डॉ.रमेश पाटील आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक ढोमने यांनी एकता गणेश मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षक राजेंद्र चौधरी, राजेंद्र मोहितकर, पंकज वंजारी, चंद्रकांत काळे, जीवन बुरडे आणि राजू लोणारे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले.संचालन एकता गणेश मंडळाचे रवींद्र कुंभारे यांनी केले.