देवेंद्र सिरसाट.नागपूर.शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील तरुणांना स्वत:चे व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ (पीएमएफएमई). जिल्ह्यात या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी तीनशेवर लाभार्थ्यांनी अर्ज केले असून, ७१ लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले आहे. त्यांना शासनाकडून १.४४ कोटीची सबसिडीही प्राप्त झाली आहे.केंद्र शासन सहायित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. योजनेंतर्गत केंद्र व राज्याचे अर्थसाह्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. आजवर नागपूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे या योजनेसाठी एकूण २३० लाभार्थ्यांचे अर्ज बँक स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीने पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी ७१ लाभार्थ्यांना बँकांकडून कर्जही मंजूर झाले असून, त्यांना शासनाकडून १ कोटी ४४ लाख रुपयांची सबसिडीही मंजूर झाली आहे. सोबतच बँकांकडे आणखी ९० लाभार्थ्यांचे कर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी सांगितले.कोण घेऊ शकतो योजनेत सहभागप्र धानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला, स्वयंसहायता गटाला शेतकरी उत्पादक कंपनीला सहकारी संस्थेला, तसेच एनजीओलाही या योजनेचा लाभ घेता येतो.