सोयगाव प्रतिनिधी ; गोकुळसिंग राजपूत
सोयगाव जीएसटीच्या फेऱ्यात आता घरापुढील अंगणाची शोभा वाढवणारी रांगोळी आल्याने, रांगोळीचे दर भडकले आहेत. पूर्वी पूजासाहित्य व अन्य गोष्टींवर जीएसटी नसल्याने त्यांचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्यात होते. मात्र, मार्बल प्रॉडक्ट गणल्याने रांगोळीला जीएसटीचा १२ टक्के अधिभार वाढल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घरासमोरील रांगोळीचा आकार आता कमी होत असल्याचे चित्र सणासुदीला पाहावयास मिळणार आहेत.
घरापुढे सारवलेले अंगण त्यावर रेखाटलेली सुंदरशी रांगोळी, रांगोळीचे विविध आकार आणि त्यात भरलेले नानाविध प्रकारचे रंग हे सार पाहिलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. हैदृश्य सध्यातरी पाहायचे म्हटले तर दूर कुठेतरी खेड्यापाड्यात जावे लागेल. कारण शहरांच्या घरांना आता अंगणच राहिलेले नाही. त्यामुळे अंगणाविना रांगोळी पारखी झाली आहे. रांगोळी ही आपली धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. कोणताही सण असो, उत्सव असो किंवा धार्मिक पूजा विधी असो दारापुढील अंगणात मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी रांगोळी काढली जातेच. विशेषतः सणासुदीला नवरात्र, दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत दारात सजलेली रांगोळी उत्सवाची शोभा वाढवते.
रांगोळी गुजरातमधून देशभर विक्रीसाठी जाते. शुभ्रपणा व चमकदार रांगोळीसाठी छोटा उदयपूर, अलीराजपूर या जिल्ह्यांची ओळख आहे. मध्य प्रदेशमधूनदेखील रांगोळी विक्रीसाठी देशभर जाते. मात्र गुणवत्तेच्या बाबतीत गुजरातची रांगोळी सरस असल्याचे विक्रेते मानतात. प्रामुख्याने रांगोळी मार्बल प्रॉडक्ट’ म्हणून गणले जाते. मार्बल फरशीवर आधीच जीएसटी लागू असल्याने त्यापासून होणाऱ्या प्रॉडक्टवरही जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने वाहतूक खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे यंदा सणवारात रांगोळी काढणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल.
२२० ते २८० रुपये दर
रांगोळीच्या ४० किलोच्या पोत्यामागे सरासरी ५० ते ८० रुपये दर वाढले आहेत. पूर्वी पांढया रांगोळीचे ४० किलोचे पोते १४० ते १६० रुपयांपर्यंत मिळत होते. ते आता २०० ते २४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर १५० ते १८० रुपयांच्या घरात असणारी रंगीत रांगोळी आता २२० ते २८० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
सणासुदीच्या काळात रांगोळीला मोठी मागणी असते. विशेषतः नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत ग्रामीण व शहरी दोन्ही भागात रांगोळीला विशेष मागणी असते. मात्र शासनाने रांगोळीवर जीएसटी लावल्याने रांगोळीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षाच्या तुलनेत रांगोळीची खपत कमी झाली आहे. आधीच कोरोनामुळे गत दोन वर्षात रांगोळीची मागणी घटली होती. रांगोळी पूजा साहित्य प्रकारामध्ये गणली जाते. केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेऊन किमान पूजा साहित्यावरील जीएसटी त्वरित रद्द करावी, अशी आमच्या व्यापारीवर्गाची मागणी आहे.
Users Today : 16