जिल्हा परिषदेवर ‘केदारां’चा बोलबाला कायम ..

Khozmaster
3 Min Read

अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कॉंग्रेस उमेदवारांचीच वर्णी भाजपच्या बावनकुळेंचा गेम फसला.देवेंद्र सिरसाट.नागपूर.     नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारला झालेल्या विशेष सभेत अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षपदी कुंदा राऊत यांचा विजय झाला. पुन्हा एकदा अध्यक्ष व उपाध्यक्षपदी माजी मंत्री आमदार सुनील केदार गटांच्याच उमेदवारांची वर्णी लागल्यामुळे जि.प.मध्ये केदारांचाच बोलबाला दिसून आला. तर ऐनवेळी विरोधी पक्ष भाजपने आपल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेत कॉंग्रेसमधून बंडखोरी करुन निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रितम कवरे व नाना कंभाले यांना समर्थन दिले.जि.प.च्या ५८ जागांपैकी ३२ सदस्य हे कॉंग्रेसकडे आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, अपक्ष, गोगंपा यांचीही त्यांना साथ आहे. सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी कॉंग्रेस व राकॉं हे दोन्ही पक्ष आघाडीने लढले होते. गत अडीच वर्षात राकॉंला विरोधकांपेक्षाही वाईट वागणुक मिळाली. त्यामुळे त्यांचे सदस्य नाराज होते. त्यामुळे यंदातरी राकॉंच्या वाट्याला उपाध्यक्षपद तरी येईल, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण हे यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखीव होते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसमध्ये फुट पडू नये यासाठी शुक्रवार (ता.१४) रोजीच सर्व सदस्यांना कळमेश्वर मार्गावरील अंबिका फार्म हाऊसवर हलविण्यात आले होते. रविवारी कॉंग्रेस पर्यवेक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी सर्व सदस्यांची मतेही जाणून घेतली. यावेळी आ. केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, सुरेश भोयर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्या शांता कुमरे यांचीच अध्यक्षपदी वर्णी लागेल अशी सर्वांनाच आशा होती. परंतु सोमवारला सकाळी वेळेवर अध्यक्षपदासाठी पाटणसावंगी जि.प.सर्कलच्या मुक्ता कोकड्डे यांचे नाव अंतिम झाले. तर उपाध्यक्षपदीही केदार यांच्याच गटातील व नागपूर (ग्रा.) तालुक्यातील गोधनी रेल्वे सर्कलच्या कुंदा राऊत यांचे नाव अंतिम करण्यात आले. परंतु यानंतरही कॉंग्रेसचे बंडखोर नाना कंभाले यांनी आपला बंड कायम ठेवला. त्यांनीही अध्यक्षपदासाठी जलालखेडा सर्कलचे कॉंग्रेस सदस्य प्रितम कवरे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी कंभालेंनी स्वत:चा अर्ज दाखल केला. त्यातच विरोधी पक्ष भाजपनेही अध्यक्षपदासाठी हिंगण्यातील सातगाव सर्कलच्या निता वलके व उपाध्यक्षपदासाठी मौद्यातील चाचेर सर्कलचे कैलास बरबटे यांचा अर्ज भरला. दुपारी ३.१५ ते ३.३० दरम्यान नामनिर्देशनपत्र परत घेण्याची वेळ असतानाच भाजपने आपल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेत कॉंग्रेसच्या बंडखोर असलेल्या कवरे व कंभाले यांना समर्थन जाहिर केले. दुपारी ३.४५ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. यामध्ये काँग्रेसच्या मुक्ता कोक्कड्डे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूकित ३९ मते घेतली तर बंडखोर कवरे यांना १८ मते पडलीत. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांना ३८ मते पडलीत तर बंडखोर कंभाले यांना १९ मते मिळाली.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *