मुंबई : दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण केल्याचं काल समोर आलं होतं. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये (Bada Kabrastan South Mumbai) दफन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या वृत्ताने काल एकच खळबळ उडाली होती. अखेर आज मुंबई पोलिसांनी कारवाई करुन याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील बडा कब्रस्तानमधील मेमनच्या कबरीची पाहणी करतील.
याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचं वृत्त बुधवारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या एका टीमने तातडीने दक्षिण मुंबईतल्या बडा कब्रस्तानमधल्या मेमनच्या कबरीची पाहणी केली. आज पुन्हा एलटी मार्गच्या पोलीस पथकाने कब्रस्तानात जाऊन पाहणी केल्यानंतर कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. तर ‘शब ए बारात’निमित्त लायटिंग लावली होती, असं तिथल्या ट्रस्टीचं म्हणणं होतं.