प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात अंगझडती घेतली असता ४० हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल चोरी केल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा ते नंदुरबार बसमध्ये सुनिल हंसाराम साळुंखे (रा. रामनगर पिंपळनेर ता. साक्री) हे प्रवास करीत असतांना त्यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल लंपास झाला. नंदुरबार बसस्थानक येथे आले असता बस मधील समीर उर्फ घुगरु शेख अजिज व शेख मोहम्मद सादीक (दोघे रा. लिंबायत नगर, सुरत) यांची अंगझडती घेतली असता सुनिल साळुंखे यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून आला. तसेच १० हजार रुपये किमतीचे प्रत्येकी तीन मोबाईल दुसऱ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे दोघांनी सांगितले. त्यांच्या कडून ४० हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले. या बाबत सुनिल साळुंखे यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव करीत आहेत.
