नंदुरबार प्रतिनिधी ;–
जिल्ह्याच्या मुख्य वाहतूक धमन्यांपैकी एक असलेला नंदुरबार-दोंडाईचा मार्ग सध्या अक्षरशः “महामार्ग” पेक्षा “खट्टेमार्ग” बनल्याचे चित्र दिसते. भोणे फाटा ते जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हे खड्डे वाहनचालकांसाठी जणू यमदूत ठरत आहेत.
या मर्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी आता अडथळ्यांची शर्यत बनली आहे. मोठे खड्डे, खोलगट भाग आणि उखडलेली साईडपड — या सर्वामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रुंदीकरण सुरू, पण नागरिकांचे हाल कायम
या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यासाठी तब्बल अडीच वर्षांची मुदत असल्याने, गेल्या सात महिन्यांपासून खोदलेला रस्ता तसाच पडून आहे. परिणामी, नागरिकांना दैनंदिन प्रवासात अक्षरशः “खड्ड्यांचा महामार्ग” पार करावा लागत आहे.
अपघातांची मालिका
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर सतत अपघात घडत आहेत.
अलीकडेच रजाळे येथील एक तरुण रस्त्यालगत साईडपट्टीवरील मोठ्या खड्ड्यात दुचाकीसह कोसळल्याने गंभीर जखमी झाला. हा अपघात रस्त्याच्या दुरवस्थेचे ज्वलंत उदाहरण ठरला आहे.
रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिक धोकादायक बनते. दृश्यमानता कमी असल्याने खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा तोल जातो आणि अनेकदा गंभीर अपघात घडतात.
नागरिकांचा संताप
स्थानिक वाहनचालक राजेश पाटील सांगतात,
“रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रत्येक प्रवास धोकादायक बनला आहे. शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध, सगळ्यांचे हाल होत आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर मोठी दुर्घटना होणे अटळ आहे.”
प्रशासनाचे दुर्लक्ष?
रुंदीकरणाच्या नावाखाली रस्ता उखडून ठेवण्यात आला असला तरी, दुरुस्ती किंवा तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी साईडपट्टीवरील झाडे काढण्यात आली, मात्र खड्डे मात्र तसेच राहिले.
नागरिकांनी प्रशासनाकडे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नंदुरबार-दोंडाईचा महामार्ग ‘खट्टेमार्ग’ बनला! भोणे फाट्यापासून कृषी अधीक्षक कार्यालयापर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, अपघातांची मालिका सुरू
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment