मुर्तीजापुर तालुक्यातील – शेतकरी म्हटलं की अनेक समस्यांचा सामना करण्यासाठी सदैव तयार असणारं माहेर घर बनल्याचे दिसते आहे कधी महागाईचा तर कधी निसर्गाचा, जंगली प्राण्यांचा अश्यातच आणखी एका समस्येची भर पडली ती म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य अर्थात बोरवेल मशिन ,स्प्रिंकलरचे नोझल,शेतातील केबल असे साहित्य अज्ञात चोरटे चोरून नेत असून चोरट्यांनी मांडलेल्या या उच्छादामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.तालुक्यातील ग्राम हातगाव आणि जामठी येथे घडली असून या भागातील १२ ते १५ शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून सद्यस्थितीत शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.याबाबत मुर्तिजापुर शहर तसेच मुर्तिजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांनी चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू असून शेतामध्ये तूर हरभरा गहू भाजीपाला फुले व फळे अशी पिके आहेत.पिकांना पाणी देणे गरजेचे असते. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून सदर साहित्य आपले काम भागविण्याकरता मागून आणलेले देखील होते. त्यांना देखील नाहक भुर्दंड बसला आहे. याबाबत संदीप कथलकर राहणार हातगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून त्यांच्या शेत शिवार गट क्रमांक ३७ मध्ये एकूण ९ एकर शेती आहे.त्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल पिवळ्या धातूचे चोरून नेले असून तसेच आजूबाजूच्या शेतशिवारात असलेले प्रदीप गुप्ता, जितेंद्र कथलकर,खुशाल इंगळे,राजेंद्र महल्ले,सुनील मालानी,वईदखान मजीदखान, निलेश राऊत,अजय पातुर्डे यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.एका नोझलची किंमत जवळपास ५०० ते ६०० रुपये असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम जामठी येथील शेतकरी अक्षय राऊत,रामकृष्ण कथलकर, राजेश राऊत यांच्या शेतातील एकूण ७३ पितळी नोझल चोरीला गेले असून त्याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला अपराध क्र.०८/२३ कलम ३७९ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास ठाणेदार पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Users Today : 26