वाशीम
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता सन २०२५-२६ च्या पाणीटंचाई कृती आराखड्यांतर्गत विविध गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट आणि रिचार्ज ट्रेंच या उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी एकूण ७४ लाख ३९ हजार ६८८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जिल्ह्यातील १२ गावांमध्ये ३६ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
भूजल पातळीत सातत्याने होत असलेली घट आणि उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशीम यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. वरिष्ठ भुवैज्ञानिकांनी तांत्रिक तपासणी करून अंदाजपत्रकास मान्यता दिल्यानंतर या कामांना मंजुरी देण्यात आली.
या योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील दुधोरा व बेंबळा, मंगरूळपीर तालुक्यातील निंभी व एकांबा, मानोरा तालुक्यातील भोयनी व वार्डा, मालेगाव तालुक्यातील चिवरा व दुधाळा, रिसोड तालुक्यातील वडजी व येवता तसेच वाशीम तालुक्यातील सावरगाव जिरे व उकळी पेन या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक गावात तीन उपाययोजना राबविण्यात येणार असून प्रत्येक गावासाठी ६ लाख १९ हजार ९७४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील नागरिकांना या उपाययोजनांचा थेट लाभ मिळणार असून दीर्घकालीन जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापनासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत
Users Today : 32