डॉ. एच. पी. तुम्मोड बुलडाणा, दि. 11 : इतर कारणामुळे मृत्यूपेक्षा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही दुचाकीस्वारांचा यात मृत्यू अधिक आहे. प्रामुख्याने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले.आज रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे उपस्थित होते.डॉ. तुम्मोड म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने युवा वर्गात वेगाने वाहन चालविण्यासोबत विनाहेल्मेट आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मृत्यू होत आहे. येत्या काळात आपल्या राज्यातील रस्ते चांगले होत असले तरी त्यावर कोणत्या वेगाने वाहन चालविले पाहिजे, याचे भान राखणे गरजेचे आहे. वाहन चालविताना अपघात झाल्यास स्वत:सोबत समोरच्या व्यक्तीचेही नुकसान होते. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना देताना वाहनचालविण्यात निपून असणाऱ्यांनाच परवाना देण्यात यावा. वाहन चालविताना हेल्मेट सक्ती करावी. यामुळे अपघात झाला तरी मृत्यूचे प्रमाण कमी होईल.श्री. आवाड यांनी, रस्ते सुरक्षा अभियानामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे. अपघाताच्या प्रमाणात घट होत असली तरी यात मृत्यूमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने दुचाकीच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. अपघातानंतर वैद्यकीय सुविधा मिळाली नसल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हेल्मेटस्क्तीसोबत वाहन चालविताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.सुरवातील जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी रस्ते सुरक्षा अभियानाबाबत वाहनांवर स्टिकर लावलेत. त्यानंतर सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन केले. कार्यक्रमात परिचारिका, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक रितेश चौधरी यांनी रस्ते सुरक्षेची शपथ दिली. रस्ते सुरक्षेची जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी हिरवी झेंडी दाखवली.श्री. गाजरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल रिंढे यांनी सूत्रसंचालन केले. सुरज कोल्हे यांनी आभार मानले.
Users Today : 35