गजानन घोंगडे यांच्या ‘गंमत जंमत’ ने विवेकानंद विचार मंचाच्या व्याख्यानमालेची झाली सांगता सुमित सोनोने प्रतिनिधी/मुर्तिजापूर मराठी माणसाच्या वागण्या बोलण्यातील व्यंग अचूकपणे टिपून त्याचे विडंबनात्मक सादरीकरण करीत धमाल उडवून देणारे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी मुर्तीजापुरकरांना अक्षरशः दीड तास हास्यकलोळात बुडविले. येथील स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे आयोजित व्याख्यानमालेची सांगता गुरुवारी त्यांच्या एकपात्री गंमत जंमत या विनोदी कार्यक्रमाने झाली. याप्रसंगी मंचावर भारतीय ज्ञानपीठ शिक्षा मंडळाचे संचालक संतोष पाठक होते.आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात खळखळून हसणे दुरापास्त झाले असताना दोन अतिशय गंभीर अशा विषयांवरील व्याख्यानानंतर तिसऱ्या दिवशी गजानन घोंगडे यांनी श्रोत्यांना हास्य विनोदाची मेजवानी देऊन खिळवुन ठेवले व श्रोत्यांची दाद मिळवली.टीव्हीवरील जाहिरातींचे विडंबनात्मक सादरीकरण तसेच ग्रामीण भागातील शाळांच्या स्थिती व तेथे घडणारे विनोदी किस्से, शालेय अभ्यासक्रमातील विषय व व्यवहारिक जीवनातील विसंगती यांवर मार्मिक भाष्य करीत त्यांनी श्रोत्यांना हसविले.दैनंदिन जीवनात अनुभवास येणाऱ्या विनोदी व्यक्तिरेखा, मराठी माणसाकडून इंग्रजी बोलण्याच्या हव्यासापोटी झालेले विनोद त्यांनी सादर करून श्रोत्यांना हसत ठेवले.सिने कलावंत अमिताभ बच्चन,सनी देओल, राजकुमार, शाहरुख खान, सुनील शेट्टी, तसेच अण्णा हजारे शरद पवार यासारख्या दिग्गज राजकारणी व सामाजिक क्षेत्रातील नामवंतांची हुबेहूब नक्कल करून त्यांनी श्रोत्यांना बेभान करून सोडले. आपल्या सरळ सोप्या आणि विनोदीची झालर असणाऱ्या शैलीतून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संतोष पाठक यांनी तर संचालन प्रा.दीपक खवले यांनी केले. प्रबोध बापट यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Users Today : 18