मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने घेतला वारक येथील महेंद्र जाधव यांचा जीव, निर्दयी प्रशासनाला अपघात ग्रस्तांची कधी येणार कीव…!

Khozmaster
2 Min Read
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रेपोली येथे काल अर्थात गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या इको आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या महा भयंकर भीषण अपघातात गुहागर हेदवी येथे श्राद्धविधी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबातील तब्बल १० व्यक्तींना आपला अनमोल जीव गमवावा लागला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेमुळे गुहागर हेदवी सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली. या दुर्दैवी घटनेच्या दुःखद वृतांताच्या वर्तमान पत्रातील बातमीची शाई सुकते न सुकते तर माणगाव पासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या टू व्हिलर स्कूटी अपघातात वारक बौद्धवाडी येथील महेंद्र जाधव यांचा मृत्यू झाला. सदरची घटना शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद प्रवीण प्रकाश जाधव (वय २८) रा. वारक बौद्धवाडी ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
      सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघातातील फिर्यादी प्रवीण प्रकाश जाधव यांचे मयत झालेले चुलते महेंद्र शिवराम जाधव (वय ४०) रा. वारक बौद्धवाडी, ता. माणगाव हे आपले सहकारी सचिन करकरे यांच्या सोबत त्यांच्या ताब्यातील ऍक्टिव्हा स्कूटी क्रमांक एमएच ०६ बीवाय ०४६८ या गाडीवरून एचपी गॅसचा खाली बाटला समोरील बाजूस ठेवून गॅस भरून आणणेकरिता माणगाववरून कोलाड येथे जात असताना मयत महेंद्र जाधव यांनी त्यांच्या ताब्यातील स्कूटी हि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवीत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावर सदरची स्कूटी घसरून त्यावरील मयत यांचा ताबा सुटल्याने स्कूटी रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर जाऊन धडकून अपघात घडला. या अपघातात चालक महेंद्र जाधव यांचा मृत्यू होऊन स्कूटीचे नुकसान झाले असून पाठीमागे बसलेले सचिन करकरे यांनाही किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.११/२०२३ भादवि संहिता कलम ३०४ अ,२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यां मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर करीत आहेत.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *