दौंड (प्रतिनिधी) – तालुक्यातील दापोडी येथील रहिवाशी असलेल्या आणि पेशाने एक प्रख्यात डॉक्टर असलेल्या डॉ. सौ. स्वाती प्रदिप रुपनवर यांचे शनिवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी आकस्मित निधन झाले. त्या अवघ्या ३३ वर्षांच्या होत्या. अत्यंत अल्प वयामध्ये मोठे कर्तुत्व निर्माण करत त्यांनी यशाचे शिखर गाठले होते. आपल्या कुशाग्र बुध्दिमत्तेच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय शिक्षण बी.ए.एम.एस पुर्ण केले आणि वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता. रुपनवर हॉस्पिटल व प्रसुतीगृहाच्या त्या सीईओ होत्या. पुणे जिल्ह्यात व दौंड तालुक्यात अत्यंत शिस्तबद्ध आणि लोकांची सेवा करण्याची आवड असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. वैद्यकीय पेशाच्या माध्यमातुन लोकसेवेची आवड असल्यामुळे लोकांच्या वेदना समजावुन त्या कमी करण्याकडे त्यांचा कल होता. मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावामुळे त्यांना सर्व लोक आपले मानत असत. उच्च आचार आणि विचारांच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. पुणे जिल्ह्यात येथे एका सुसंस्कृत कुटुंबात जन्म झालेल्या कै. डॉ. स्वाती रुपनवर यांनी जीवनात मेहनतीने यश मिळवुन समाजापुढे एक आदर्श उभा केला. समाधानी आणि परोपकारी वृत्ती हे त्यांच्या स्वभावामधील उठुन दिसणारे गुण होते. त्यांच्या अत्यंत कमी वयातील आकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ. प्रदिप बाबुराव रुपनवर, सासरे श्री. बाबुराव रघुनाथ रुपनवर व श्री. शहाजी रघुनाथ रुपनवर, दिर श्री. योगेश भरत रुपनवर, दोन मुले आर्यन रुपनवर व अर्चित रुपनवर असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी तिरावर सकाळी ८ वाजता होईल.
Users Today : 22