आंबेडकरी तत्वविचारांना उजाळा देण्याचा निरंतर ध्यास असणारे उर्जावान व्यक्तीत्व प्रा.डाॅ.संतोष बन्सोड

Khozmaster
3 Min Read

प्रतिनीधी रवि मगर-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र(संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती) द्वारे दि.०८मार्च २०२३ ला विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.या

चर्चासत्राचा मूख्य विषय ” लोकशाही व तिच्या अंमलबजावणी विषयी डाॅ.आबेडकरांचा दृष्टीकोण” हा होता.या चर्चासत्राचे नितांतसुंदर,सुनियोजित व सुत्रबद्ध आयोजन ज्यांच्या कल्पकतेतुन व आंबेडकरी तत्वनिष्ठेतुन झाले ते उर्जावान व कार्यकुशल,मितभाषी, विनम्र व्यक्तीत्व म्हणजे प्रा.डाॅ.संतोष बन्सोड……. चर्चासत्रे,परिषदा,कार्यशाळा यांचे आयोजन तसे अनेक लोकं,अनेक ठिकाणी करीत असतातच….यशही मिळत असतंच…..पण डाॅ.संतोष बन्सोड यांच्या पुढाकारातुन,समन्वयातुन घडून आलेल्या परिषदांमधुन ज्या प्रकारचे विचारप्रवर्तन घडुन येते,आंबेडकरी विचारांची महती ज्या पद्धतीने अधोरेखीत होते,ते अतुलनिय आहे. अमरावती व चंद्रपुरच्या तिन्ही परिषदांमधून हे प्रकर्षाने दिसुन आले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे समन्वयक म्हणुन त्यांचे ते कार्यच आहे,असे कुणाला वाटू शकेलही,….पण बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वाला व विचारांना जनमनावर ठसविण्याची तळमळ,आग्रह, विचारनिष्ठा,लोकसंग्रह,अहंकारविहीनता,सुसंगतता,सौंदर्यदृष्टी,गतिमानता, याबरोबरच सर्वाविषयीची सहृदयता या बाबी डाॅ.संतोष बन्सोड यांचे वेगळेपण दर्शवितात. गेल्या काही वर्षातील त्यांची शैक्षणिक,संशोधन क्षेत्रातील वाटचाल व यश उल्लेखनिय व आनंद वाटावा असेच आहे.केवळ आणि केवळ त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक चिंतक विद्वान,अभ्यासक,संशोधक एकत्र येतात याची प्रचिती सातत्याने येत आहे. एखादेवेळी सर्वांना सोबत आणता येईलही,पण निरंतर सर्वांना सोबत ठेवण्याचे कुठले गमक त्यांनी साध्य केले,ते त्यांनाच माहित…..यावेळी झालेले चर्चासत्र अधिक विचारप्रवर्तन करणारे ठरले.चर्चासत्राचा आरंभ करणारे मा.कुलगुरू डाॅ.दिलीपजी उके यांच्या प्रारंभ भाषणाने ज्या प्रकारे बाबासाहेबांच्या विचारांना प्रभावीपणे फुलविले,त्यामुळे बाबासाहेबांच्या विश्वव्यापी कार्यकर्तृत्वाला नव्याने उजाळा मिळाला. गतकाळ आणि वर्तमान यावरील त्याचे सुस्पष्ट व परखड विचार आंदोलित करून गेले.काळवंडू पाहणार्‍या वर्तमानात लोकशाही व संविधानासमोर निर्माण होणार्‍या आव्हांनाविषयीची त्यांची भुमिका संपूर्ण चर्चासत्रावर प्रभाव टाकणारी ठरली.प्रकुलगुरू डाॅ.वाडेगावकर सर,कुलसचिव डाॅ.देशमुख सर यांची मनोगते प्रेरक अशीच होती.बिजभाषक डाॅ.अजीतकुमार यांनी अतिशय अभ्यासपुर्ण पद्धतीने आंबेडकरी विचारांची मांडणी केली.प्राचार्य डाॅ.सुभाष गवई सरांच्या अध्यक्षतेत झालेले पहिले सत्र उद्बोधक ठरले.डाॅ.संदेश वाघ आणि डाॅ. प्रिती खंडारे यांनी क्रमशः बाबासाहेबांचे लोकशाही तत्वज्ञान आणि महिलांचे सक्षमीकरण यावर नाविण्यपूर्ण विचारप्रकटन केले.दूसर्‍या सत्रातही “संविधानाची सामाजिक बदलातील भुमीका” या विषयावर चिंतन व मंथन झाले.सत्राध्यक्ष डाॅ.रविंद्र मुंद्रे यांनी खुप सुंदर व मुद्देसुदपणे आंबेडकरी विचारांची अपरिहार्यता पटवून दिली. प्रमुख वक्ते डाॅ.वामन गवई सर आणि डाॅ.जगदिश सोनवणे सरांनी आपल्या वक्तृत्वशैलीने श्रोत्यांना मुग्ध केले.  संशोधन पेपर चे वाचन करणार्‍या संशोधकांनी नविन विषयांची मांडणी केली,हे स्तुत्य आहे.या सत्राचे अध्यक्ष डाॅ.बी.आर वाघमारे सर,हे आंबेडकरी तत्वविचारांचे ख्यातकिर्त अभ्यासक म्हणून सर्वदूर परिचित आहेत… व्यासंग,भाषाप्रभुत्व,अमोघ वक्तृत्व आणि विचारांचे प्रवाहीपण हे मी विद्यार्थीदशेपासून अनुभवतो आहे.त्यांचा विद्यार्थी असणं ही माझ्यासाठी सन्मानाचीच बाब…..बी.ए.ला आणि पि एच डी लाही तेच मार्गदर्शक म्हणुन लाभले.सरांचं बोलणं सुरू झालं की त्या विचारलहरींनी मन आंदोलित होतं…..प्रभावी पणे विचारमांडणी कशी करावी हे वाघमारे सरांकडूनच शिकायला मिळालं…समारोपीय सत्रातील सत्राध्यक्ष अधिष्ठाता डाॅ.मोना चिमोटे मॅडम,डाॅ.सिकची सर,डाॅ.अभ्यंकर सर यांनीही डाॅ.आंबेडकरांच्या युगप्रवर्तक कार्यावर प्रभावी भाष्य केले….एकंदरीत हे चर्चासत्र अपेक्षेपलिकडे यशस्वी ठरले.सकाळी साडेदहापासून सायं.साडेसातपर्यंत संशोधक,अभ्यासक,नवं विशेष विचारभाष्य ऐकण्यासाठी आतूर होते…..हल्लीच्या काळात असं अभावानेच दिसून येतं….हे सर्वच यशस्विपणे घडवून,जूळवुन आणणारे किमयागार डाॅ.संतोष बन्सोड आहेत,याचा सार्थ अभिमान वाटतो.त्यांच्या सकस,समंजस,समन्वयात्मक भुमीकेला या यशाचे सर्वाधिक श्रेय आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आंबेडकरी विचारांचे सर्जन,चिंतन,मनन,प्रवर्तन आणि सशोधन निरंतर सुरू असते.त्यांचे हे कार्य अधिक वृद्धिंगत होवो,हिच सदिच्छा…

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *