मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा सहकुटुंब एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक व विविध पक्षाचे नेते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी येत असतात. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा कसा साजरा करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.बारामतीतील गोविंद बाग हे केवळ पवार साहेबांचं निवासस्थान नसून तमाम महाराष्ट्रातील जनतेचे माहेराचं आणि अधिकाराचा, हक्काचं घर आहे. त्यामुळे गोविंद बाग हे वर्षातील ३६५ दिवस महाराष्ट्रासह देशभरातील जनतेसाठी सदैव खुले आहे. या घरावर जेवढा माझा हक्क आहे. त्याहून जास्त मायबाप जनतेचा आहे, असे सुळे यांनी सांगितले. पवार कुटुंबीय यंदाचा दिवाळी दसरा एकत्र साजरा करणार का, या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, पवारांची दिवाळी कालही एकत्र होती आजही एकत्र आहे. उद्याही एकत्र राहील. आमच्यात राजकीय मतभेद जरूर निर्माण झाले आहेत. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक बाबी ह्या वेगळ्या असतात. त्यामुळे कुटुंबातील नाती जबाबदाऱ्या कुणीही डावलू नये या मताची मी आहे. कारण आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीत गल्लत करू नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
Users Today : 39