धाराशिव / कळंब – प्रतिनिधी
कळंब शहरातील रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40 हजार रुपयांच्या कथित हप्त्याची मागणी करून त्यापैकी 36 हजार रुपये स्वीकारताना दोन पोलिस अंमलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईनंतर आता केवळ दोन कर्मचाऱ्यांपुरते हे प्रकरण मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा पोलिस प्रशासन आणि विशेषतः जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या प्रकरणी पोलिस अंमलदार अशोक दादाराव करवर आणि सिद्धेश्वर प्रकाश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक बाळू संपती जाधवर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
“धंदा चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल”
तक्रारदार यांचा कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटरचा व्यवसाय असून तो सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपींनी कथितरित्या 40 हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. त्यामध्ये 20 हजार रुपये पोलिस निरीक्षकांसाठी आणि 20 हजार रुपये दुय्यम अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, “तू अधिकाऱ्यांना भेटलास तर तुझा स्पाचा धंदा बंद करून कारवाई करतील. धंदा सुरळीत चालवायचा असेल तर आमच्याशीच बोलावे लागेल,” असे आरोपींनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर पंचांसमक्ष आरोपींनी 36 हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे कबूल केल्यावर ACB ने सापळा रचून होळकर चौक ते तांदळवाडी मार्गावरील हॉटेल गुलमोहर बिर्याणी हाऊस समोर तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये आरोपींना रंगेहात पकडले.
“हप्ता संस्कृती”वरून जिल्हा पोलिस प्रशासन अडचणीत
या कारवाईनंतर आता जिल्ह्यातील स्पा सेंटर, अवैध व्यवसाय, बार, जुगार अड्डे आणि इतर धंद्यांमधून कथित हप्ते वसूल केले जात असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे इतक्या उघडपणे लाचेची मागणी करण्याचे धाडस येते तरी कुठून? हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे आरोपींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करत “धंदा चालवायचा असेल तर हप्ता द्यावाच लागेल” असा इशारा दिल्याचे समोर आल्याने आता जिल्हा पोलिस प्रशासनाची अंतर्गत यंत्रणा, देखरेख आणि नियंत्रण यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
SP रितू खोखर यांच्यावर थेट सवाल
या प्रकरणानंतर नागरिकांमधून आणि सामाजिक स्तरावर खालील गंभीर प्रश्न विचारले जात आहेत :
जिल्ह्यातील कथित “हप्ता संस्कृती”बाबत SP कार्यालयाला पूर्वीपासून माहिती होती का?
आरोपी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर नेमका कोणाच्या विश्वासावर केला?
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये महिनावारी वसुलीची साखळी कार्यरत आहे का?
SP कार्यालयाची अंतर्गत व्हिजिलन्स यंत्रणा प्रत्यक्षात काम करते का?
फक्त दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण दाबले जाणार का?
संबंधित पोलिस निरीक्षक आणि दुय्यम अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार का?
जिल्ह्यातील इतर स्पा सेंटर किंवा अवैध व्यवसायांकडूनही अशाच प्रकारे वसुली होत होती का?
ACB च्या कारवाईनंतरच भ्रष्टाचार उघड होतो, मग स्थानिक पोलिस प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही?
या प्रकरणातील कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि वरिष्ठांशी संपर्क तपासला जाणार का?
जिल्हा पोलिस दलातील जनतेचा ढासळलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी SP कार्यालय कोणती ठोस पावले उचलणार?
“प्यादे पकडले की संपूर्ण साखळी उघड होणार?”
या कारवाईनंतर जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे — ACB च्या जाळ्यात फक्त दोन “प्यादे” अडकली आहेत की या प्रकरणातून आणखी मोठी नावे समोर येणार आहेत?
जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा आधीच विविध कारणांनी चर्चेत असताना, आता या प्रकरणामुळे प्रशासनावरील विश्वासाला आणखी धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ दोन कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माधुरी केदार कांगणे तथा शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय वगरे हे पुढील तपास करीत आहेत.
Users Today : 14