दिव्यात भाजपला धक्का बसला आहे. शिंदे गटाचे कट्टर विरोधक व माजी दिवा भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला आहे.विविध आंदोलने आणि थेट टीका करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना अंगावर घेणाऱ्या माजी दिवा भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे येत्या काळात दिव्यात शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.दिवा भाजप शहर अध्यक्षपदी असताना रोहिदास मुंडे यांनी शिंदे गट आणि पालिका विरोधात आंदोलन करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला. दिवा कचरा क्षेपणभूमी, अनधिकृत बांधकामे, पाणी प्रश्न या विषयांवरून मुंडे यांनी केलेली आंदोलन चांगलीच गाजली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित भाजप ठाणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये दिवा भाजप शहर अध्यक्ष पदावरून मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. या पदावर सचिन भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मुंडे यांनी थेट भाजप शहर अध्यक्षांवर टीकेचे बाण सोडले. तसेच शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे मला पदावरून हटवल्याचा आरोप मुंडे यांनी केला होता.
अखेर शनिवारी रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, सदानंद थरवळ आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवा भाजपमध्ये दाखल होण्यापूर्वी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काम केले होते. तसेच दिव्यातून अपक्ष निवडणूक लढवली होती. यासोबत मुंडे सध्या सेव्ह दिवा फाऊंडेशन, आगासन गाव संघर्ष समिती, दिवा मानपाडा ग्रामीण रिक्षा चालक मालक संघटना, दिवा चक्की असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करतात.रोहिदास मुंडे यांच्यासोबत भाजप चित्रपट कामगार आघाडीचे सचिव विकास इंगळे, भाजप आगासन गाव अध्यक्ष मूर्ती मुंडे, बूथ प्रमुख शनिदास पाटील, वार्ड अध्यक्ष नागेश पवार, भाजप दिवा शहर सचिव प्रशांत आंबोणकर, बूथ प्रमुख सुजय घाडीगांवकर, दिवा शहर उपाध्यक्ष उत्तम सिंग, दिवा ओडिशा सेल अध्यक्ष बैद्यनाथ पाडी ठाकरे गटात प्रवेश केला.
Users Today : 27