एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचे पाहून भाऊ त्या टवाळखोराला जाब विचारात तीन टवाळखोरांनी मिळून भावाला बेदम मारहाण करत पाय फॅक्चर करत त्याच्यावर गरब्यातच धारधार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हल्लेखोर त्रिकुटावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंजुमील अहमद शेख (वय १९) असे हल्ल्यात गंभीर झालेल्या भावाचे नाव आहे. तर अमन आणि त्याचे अनोखळी दोन साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या टवाळखोरांची नावे आहेत.
देशभरात नवरात्रीमध्ये ठिकठिकाणी धुमधडाक्यात तरुणाई गरब्यांमध्ये दांडिया खेळताना दिसत असतानाच कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात गरब्याचे आयोजन करण्यात आले. त्यातच २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी जखमी मंजुमील हा आपल्या १७ वर्षीय अल्पवीयन बहिणीसह मित्रांसोबत गरब्यात वेगळा सर्कल करून दांडिया खेळत होता. तर आरोपी टवाळखोरही दांडिया खेळत असतानाच अल्पवयीन बहिणीला एका टवाळखोराने धक्का दिल्याचे पाहून भाऊ त्या टवाळखोराला जाब विचारला असता दोघात दांडिया सुरू असतानाच वाद झाला.मात्र, काही क्षणात हा वाद विकोपाला जात टवाळखोरांनी भावाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भावाला वाचविण्यासाठी बहिणी आली असता, तिला धक्काबुकी करत तिच्या डोक्याचे केस पकडून तिला जोरदार धक्का दिला. त्यानंतर टवाळखोरांपैकी एकाने धारधार हत्याराने वार करून भावाला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे गरबा कार्यक्रमात एकच पळापळ झाली होती.असता, हत्याराने वार केलेल्या ठिकाणी १७ टाके पडले असून एक पाय फॅक्चर झाला. सध्या त्याची प्रकृतीस्थिर असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, जखमी मंजुमील शेख याच्या तक्रारीवरून कोसळेवाडी पोलिस ठाण्यात टवाळखोर त्रिकुटावार भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र, जखमी तरुणाच्या मते पोलिसांनी अल्पवीयन बहिणीशी केलेली छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगत पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केला. या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस हवालदार नामदेव के. गोडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता या गुन्ह्यातील एकही आरोपी अटक केला नसून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले