मुंब्रा:
एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगणार” असे वक्तव्य केल्यामुळे सहर शेख वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
सहर शेख यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप, विश्व हिंदू परिषद तसेच इतर संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून, त्यांना दिलेल्या कॅप्शनमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. फोटो पोस्ट करताना त्यांनी, “कलर… कलर… कोणता रंग? कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन का कुछ पता नहीं” असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली. त्यानंतर सहर शेख यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली आहे.
माफी मागताना सहर शेख यांनी स्पष्ट केले की, “माझं वक्तव्य केवळ माझ्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगासंदर्भात होतं. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगतो आणि मरतो. तरीही जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी लेखी माफी मागते.”
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून सांगितले की, “मुंब्रा येथील एआयएमआयएम नेत्या सहर शेख यांनी त्यांच्या ‘मुंब्रा हिरवं करू’ या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.”
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी देखील या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी एआयएमआयएम नेते वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सहर शेख यांचे वक्तव्य आणि त्यानंतरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून, हा वाद अद्याप शांत झालेला नाही.
Users Today : 11