प्रविण चव्हाण
नंदुरबार -: आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
चार राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी महाराष्ट्रातून गुजरात मार्गे राजस्थान राज्यात अवैधरीत्या दारुची वाहतूकी विरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने धडक मोहिम हाती घेतलेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, विसरवाडी, उपनगर या पोलीस ठाणे हद्दीला गुजरात राज्याची व शहादा, म्हसावद, धडगांव पोलीस ठाणे हद्दीला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहेत. येत्या काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातून गुजरात मार्गे राजस्थान व मध्यप्रदेश राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही.
याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना नाकाबंदी करुन अवैधरीत्या दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर व वाहनांवर कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक 30ऑक्टोबर रोजी नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीत लक्कडकोट रस्त्यावर करंजी खुर्द गावाचे अचानक पणे नाकाबंदी राबवून वाहनांची तपासणी करीत असतांना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन येतांना दिसले म्हणून, पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या साह्याने वाहन थांबविण्याचा इशारा दिला, वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले म्हणून पथकाने सदर बोलेरो वाहनाचा पाठलाग करुन थांबवून पाहणी केली असता त्यात 14 लाख 76 हजार 040 रुपये किमतीची देशी दारु व वाहन जप्त करुन
सुरेश सरजा गावीत (35) रा. सरी ता. नवापूर
सुनिल रमेश गावीत (29) रा. धनबर्डी ता. नवापूर यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील नवापूर ते लक्कडकोट रोडावर एम. एस. सी. बि सबस्टेशन जवळ निलेशकुमार गोपुभाई कोकणी (40) रा. आंबा (निशालफळी) ता. सोनगड जि. तापी गुजरात हा स्कुटीवर देशी विदेशी दारुची विक्री करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 2 लाख 17 हजार 800 रुपये किमतीची देशी विदेशी दारु व बियर असा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच नवापूर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे व त्यांची विक्री करणाऱ्या 05 इसमांविरुध्द् कारवाई करुन त्यांचेकडून 21 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नंदुरबार जिल्ह्याच्या सिमे लगत असलेल्या ठिकाणी आंतरराज्य नाकाबंदी लावलेली असून त्याठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांचे पथक 24 तास कार्यान्वीत असून गुजरात मार्गे राजस्थान व मध्यप्रदेश राज्यात जाणाऱ्या वाहनांची त्यांच्याकडून कडक तपासणी करण्यात येत आहे.
अवैध दारुची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी व जंगल परिसरात लपवून दारुचा साठा शोधून काढण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील सिमावर्ती भागात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराज्यीय नाकाबंदी लावण्यात आली आहे.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील विविध आंतरराज्यीय नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देवून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले.
Users Today : 14