छत्रपती संभाजीनगर : पाचशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून, लहान मुलांच्या सहाय्याने त्या चलनात आणणाऱ्या ‘रॅकेट’मध्ये पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांपैकी अंबादास रामभाऊ ससाने उर्फ अरूण भास्कर वाघ उर्फ मेजर हा बाजारात बनावट नोटांची विक्री करत होता.‘मेजर’कडून बनावट नोटा खरेदी करून चलनात आणण्यापुर्वीच राजू श्याम शिंदे (१९, रा. मुळ रा. दरेगाव एमआयडीसी, ता. बदनापूर जि. जालना, ह. मु. शहा कॉलनी, पडेगाव) आणि बलराम उर्फ करण सुरेश सिंग (४०, रा. राजनगर, मुकुंदवाडी मुळ रा. टेहरा ता. भटणी जि. देवरिया उत्तर प्रदेश) दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरला त्यांना संजयनगर कमान मुकुंदवाडी भागात काही मुले पाचशे रुपयांच्या बनावट नोटा खऱ्या असल्याची बतावणी करून मेडिकल दुकाने, किराणा दुकानावर चालवित असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. डीसीपी कार्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक खटावकर व पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनीही या माहितीची खात्री केली. त्यानंतर खटावकर आणि पोलिस उपनिरीक्षक घुनावत यांच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांकडे नोटांबाबत विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून देवेंद्र उर्फ भैया मोरे या १९ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली. मोरे याच्या माहितीवरून बनावट नोटा देणाऱ्या राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर ) याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर त्यानी बनावट नोटा पुरविणारा तसेच बनावट नोटा खऱ्या नोटांच्या बदल्यात विक्री करणाऱ्या ‘मेजर’ याच्याबाबत माहिती मिळाली.या माहितीवरून पडेगाव भागातून ससाने उर्फ मेजरला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मेजरकडून बनावट नोटा घेऊन चलनात आणणाऱ्या शिंदे या तरुणासह चाळीस वर्षांच्या बलराम उर्फ करण सुरेश सिंग या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
बनावट नोटा प्रकरणात ताब्यात घेतलेले मेजर याच्यासह शिंदे, सिंग या तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. कोर्टाने या तिन्ही आरोपींना तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.
Users Today : 79