यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.वणी तालुक्यातील शेतकरी राजेश श्यामराव गारघाटे यांनी त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती पीकविमा कंपनीला कळविली. सर्वेक्षणासाठी कंपनीने कर्मचारी पाठविला. पण, त्याने गारघाटे यांच्याकडे हजार रुपयाची मागणी केली. याविषयी शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले. सर्वेक्षकांच्या प्रमुखाने चौकशी केली असता शेतकऱ्याच्या तक्रारीत तथ्य आढळले. कृषी अधिकारी माने यांनी याची गंभीर दखल घेऊन सर्वेक्षकाला कामावरून कमी करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाखांवर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविषयीची सरकारकडून अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. पीकविमा कंपनीकडून मदत मिळणार या आशेवर शेतकरी आहे. ही मदत दूर असतानाच सर्वेक्षणासाठीच लूट केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढू लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गंभीर दखल घेऊन तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. तरीही विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून लूट थांबलेली नाही.
Users Today : 73