प्रविण चव्हाण
नंदुरबार -: जिल्हा पोलीस दलातील तळोदा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचा दिनांक 18 जुलै 2023 रोजी नंदुरबार शहरातील RTO कार्यालया जवळ अपघात झाला.
त्या अपघातात मुकेश सावळे यांना गंभीर दु:खापत झाल्यामुळे त्यांना तातडीने सुरत येथील युनिटी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते.
औषधोपचारासाठी मुकेश सावळे यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा पोलीस दला तर्फे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वेच्छेनेे वर्गणी जमा करुन 1 लाख 30 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.
परंतु मुकेश सावळे यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि दिनांक 22 जुलै 2023 रोजी दुर्देवी निधन झाले होते.
मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना केले होते.
पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून मयत पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचे परिवारा करीता 3,35,000/- रुपये एवढा मदत निधी अल्प काळात जमा केला.
पोलीस अधीक्षक यांनी सर्व प्रथम स्वत:तर्फे मदतनिधी दिला. पोलीस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मयत पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचे कुटुंबीयांना दिनांक 02 नोव्हेंबर रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रदान करण्यात आला.
अशा प्रकारे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वेच्छेने एकूण 4 लाख 65 हजार रुपयांची मदत मयत पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांचे कुटुंबीयांना दिलेली आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या समक्ष भेटून मांडाव्यात त्या निश्चीतच सोडविल्या जातील.
तसेच त्यांना मिळणारे सर्व प्रकारचे लाभ लवकरात लवकर देण्यात येतील असे सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपल्याच कुटुंबातील सहकारी सदस्याचे दुर्देवी निधना नंतर त्यांच्या कुटुंबीयांना केलेल्या मदतीच्या कामाचेे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस दल हे शिस्तीचे खाते असून बेशिस्त वर्तन करणारे किंवा पोलीस दलाची प्रतीमा मलीन करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते, परंतु पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्याच सहकारी सदस्याच्या दुर्देवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना स्वेच्छेने केलेल्या मदतीमुळे दु:खद प्रसंगातून जाणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
मदत निधीचा धनादेश स्वीकारतानां मयत पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांची आई उषाबाई सावळे व पत्नी प्रतिभा सावळे यांना अश्रु अनावर झाले.
यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, पोलीस निरीक्षक गौकुळ औताडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, तळोदा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचेसह मयत पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
.!!
Users Today : 44